Sunday, 29 July 2018

भावलेला सौरभ भावे


नमस्कार मित्रांनो,

ही पोस्ट टाकण्याच कारण अस की आजकाल दोन मराठी सिनेमांचा खूप बोलबाला चालू आहे. एक म्हणजे चुंबक आणि दुसरा म्हणजे पिप्सी. दोन्ही सिनेमे वेगळ्या धाटणीचे, आशयाचे आणि तितक्याच ताकदीचे. दिग्दर्शन, कलाकार, स्टोरी अश्या अनेक पिलरनी उभे राहिलेले दोन मराठी सिनेमे बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज झाले आहेत.

खरी गंमत तर पुढे आहे. वर लिहिल्याप्रमाणे दिग्दर्शन, कलाकार, स्टोरी अश्या पिलर्सनी सजलेल्या ह्या सिनेमांमध्ये एक पिलर आपल्या गोखले शाळेत तयार झालेला आहे. वाचून अजून उत्कंठा वाढली ना. माहीत आहे, आपल्याच मातीतला तो तर मग आश्चर्य,उत्कंठा, कौतुक, आनंद हे सगळं आपसूक येतच आणि हे यायलाच पाहिजे. तो मजबूत पिलर म्हणजे *सौरभ भावे* सॉरी *लेखक सौरभ भावे*. होय, हे दोन्हीही सिनेमे ह्याच पठ्याने लिहिले आहेत. वाटलं की नाही एकदम भारी. १९९९ च्या बॅचचा हा एक हुशार विद्यार्थी. आजवर आपल्या शाळेत "अ" वर्ग म्हणजे हुशार मुलांचा वर्ग अस आपण म्हणायचो, हा पण त्याच साच्यातला.

माझी आणि सौरभची तशी खास ओळख नाही. अह, अजिबात नाही. मी त्याला एक वर्ष सिनियर. माझ्या एका मित्रासारखीच हुबेहूब दिसणारी एक दुसरी व्यक्ती. तेवढीच काय ती ओळख. योगायोग म्हणजे ते दोघेही एकाच वर्गात, कदाचित पाठीपुढे बसत असतील. दोघेही गोरे आणि घाऱ्या डोळ्यांचे. एकत्र चालले की मध्ये आरसा असल्यासारखा भासेल. तर सांगायचा मुद्दा असा की चुंबक आणि पिप्सी सिनेमाचे प्रमोशन सध्या खूप ठिकाणी चालू आहे. एकदम जबरी जाहिराती, मुलाखती, फेसबुकवर पण एकदम भारी प्रमोशन. अशाच एका प्रमोशनची पोस्ट वाचत असताना हा अचानक माझ्या नजरेस पडला आणि माझा चेहरा 🤔 असा झाला. जरा मेंदूला त्रास दिला आणि शाळेतल्या सौरभची आणि ह्या सौरभची खात्री पटली. होय हाच तो अस म्हणत घरच्यांनाही ओळख पटवून दिली. त्यांनी फक्त मान हलवली माझ्या समाधानासाठी. असा विद्यार्थी जो माझ्यासाठी फक्त डुप्लिकेट होता तो आता आकाशाला गवसणी घालायला सज्ज झाला आहे. त्याने केलेले अथक परिश्रम कागदावर आणि पडद्यावर उमटले आहेत.

मी काही लिहीत वगैरे नाही ओ, पण ह्या मुलाविषयी लिहावेसे वाटले आणि आपोआप शब्द सुचत गेले.काहीतरी वेगळंच कौतुकास्पद भासवायला लावलंय लेकाने. 'अ' वर्गाव्यतिरिक्त बाकी फार कमी जणांना माहीत असेल हा. पण आता मला वाटत नाही की ही पोस्ट पाहिल्यावर कॉलर ताठ केल्याशिवाय राहील कुणी. निदान मेंदूला तरी त्रास देईल.

सौरभ भावा, तू जर ही पोस्ट वाचत अशील तर मी तुझ्यासमोर उभा राहून तुला कडक सलाम ठोकलाय असं समज. कारण आज आपल्या शाळेचं नाव आणि स्वतःच नाव मोठं केलं आहेस तू.

बस...जास्त काही लिहीत नाही. यशाची उंच उंच शिखरे तू गाठत राहो हीच भगवंतचरणी प्रार्थना.



No comments:

Post a Comment